Tuesday 2 August 2011

भोळसट नारबा

          मुंबईतल्या उपनगरातील ती बैठी खोली नारबाला खूप आवडली. कारण त्या खोलीसमोरून एक नदी वाहत होती. शिवाय नदीचा काठ सुद्धा मजबूत बांधलेला होता. नदीपासून त्या खोलीपर्यंत एक छोटासा रस्ता तयार झाला होता.
          नारबाला आपल्या गावच्या शेतातील घर आठवले. जवळूनच वाहणारी गावची नदी आठवली. नदीच्या पात्रात तासनतास सवंगड्यासोबत पोहणे आठवले.
          गावी प्रात:र्विधीसाठी लोटा घेऊन आडोशाला जावे लागे. येथे मात्र ती सोय घरातच असल्याचे पाहून तो मनात सुखावला होता. शिवाय आजूबाजूचे शेजारी चांगल्या स्वभावाचे दिसत होते. फक्त नदीचे पाणी खूपच गढूळ आणि घाणेरडे दिसत होते. तरीही नारबाने ती खोली घेण्याचा निर्णय पक्का केला. लवकरच सर्व व्यवहार पूर्ण करून नारबा त्या खोलीत राहायला आला.
          नारबा सरळ स्वभावाचा आणि धाडसी होता.गावच्या शेतीत कष्ट करूनही पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे भावकीतील एकाच्या ओळखीने मुंबईतील एका कारखान्यात त्याने नोकरी मिळवली होती. मुंबईत कोणीही ओळखीचे नसल्यामुळे राहण्याची मोठीच अडचण होती.रस्त्यावर झोपल्यावर चोरी होते, दगा फटका होतो. अशा ऐकीव बातम्यांमुळे त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईत खोली घेवून राहण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे नारबाने ही खोली घेतली होती.
          सकाळी कामावर जायचे असल्यामुळे नारबा जेवून लवकर झोपी गेला.सकाळी नळाच्या पाण्याच्या आवाजाने त्याला जाग आली.अजून पूर्णपणे उजाडले नव्हते. घरातल्या शौचालयामध्ये प्रात:र्विधी आटोपून नारबा टॉवेल घेवून मोठया खूशीतच घराबाहेर पडला. आज मनसोक्त नदीत डुंबायचे त्याने ठरविले होते.
        नदीजवळ येताच त्याच्या लक्षात आले की, नदी तुडूंब भरून वाहत आहे. परंतु नदीत कोणीच पोहत नव्हते. नदीजवळ जाताच नारबाला पाण्याची दुर्गंधी जाणवली.
          नारबाने त्या अंधारातच नदीच्या पाण्याकडे डोळे ताणून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, नदीच्या पाण्यातून घाण वाहत आहे आणि त्याचीच दुर्गंधी सुटली आहे.
       नारबाने विचार केला की, रात्री भरपूर पाऊस पडल्यामुळे सर्व घाण वाहून आली असावी. हिरमुसल्या मनाने नारबा घरी परतला आणि बादलीत जमा केलेल्या नळाच्या पाण्याने आंघोळ उरकून तो कामावर गेला.
        जवळजवळ पंधरा दिवस हा पहाटेचा क्रम सुरु होता. नळाच्या पाण्याच्या आवाजाने नारबा उठत होता आणि नदीपर्यंत जाऊन दुर्गंधीमुळे परत येत होता.
       आतापर्यंत नारबाची आजूबाजूच्या लोकांशी ओळख झाली होती. नारबाचे विनम्र वागणे पाहून शेजारी सुद्धा, एक चांगला शेजारी मिळाल्याने खुश होते. आपले शेजारी नदीवर पोहायला का जात नाहीत हा नारबाला सततचा प्रश्न सतावत होता. याविषयी शेजाऱ्यांना विचारण्याचे त्याने ठरविले होते. परंतू त्याला ते प्रशस्त न वाटल्यामुळे आजपर्यंत तो प्रश्न त्याच्या मनातच राहिला होता.
         नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार वाजता नळाच्या पाण्याच्या आवाजाने नारबा जागा झाला. आज त्याने नदीत पोहायचेच हा ठाम निश्चय केला. दररोज नदीत पोहण्याची सवय असल्यामुळे गेला महिनाभर त्याला पोहायला मिळाले नसल्यामुळे तो कासावीस झाला होता.
       घरातील प्रात:र्विधी आटोपून तो नदीकाठी आला. पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्याला किळस आली. पण आज नदीत पोहायचेच या दृढ निश्चयाने त्याने दुर्गंधीकडे दुर्लक्ष केले. टॉवेल काठावर ठेवून त्याने अंगावरील कपडे काढले. अर्ध्या प्यनटीवर पाण्यात सुर मारण्याच्या तयारीत नारबा उभा राहिला.
       नारबा तसा पट्टीचा पोहणारा होता. गावच्या नदीला पूर आला असला, तरी नारबा आपला पोहण्याचा दिनक्रम चुकवत नसे.
       आतासुद्धा ही नदी तुडूंब वाहत होती. नारबाला पाण्याचा अंदाज नव्हता आणि नदीची खोलीही माहित नव्हती. परंतू त्याची त्याला फिकीर वाटत नव्हती, तो अडखळत होता फक्त पाण्याच्या दुर्गंधीमुळे.
        त्याने आजूबाजूला पाहिले. त्या अंधारात कोणीही दिसत नव्हते. नारबाने क्षणात निर्णय घेवून पाण्यात उडी मारली आणि त्याच्या लक्षात आले की, हे चिखल मिश्रीत पाणी आहे. नारबाने पोहण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोहायला जमेना. सर्व अंग चिखलाने माखले होते. दुर्गंधीमुळे त्याला जीव जातोय असे वाटू लागले.
       नारबा आजूबाजूला स्वच्छ पाणी मिळेल या आशेने,त्या पाण्यातच इकडे तिकडे फिरत होता.पाण्याने आपल्या अंगावरील चिखलाची घाण साफ करण्याचा प्रयत्न करीत होता .पण अंग स्वच्छ होत नव्हते. उलट आणखी चिखलाचे थर बसत होते.
         अंधुक उजाडायला लागले होते. नारबाला आता स्पष्ट दिसत होते. त्याने आपल्या अंगाकडे पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपले अंग चिखलाने माखल्यामुळे काळेकभिन्न झाले आहे. नारबाच्या लक्षात आले या पाण्याने आपले अंग स्वच्छ होणार नाही. लोक जागे होण्यापूर्वी घरी जावून आंघोळ करावी या उद्देशाने तो ताबडतोब नदीबाहेर आला. आपले कपडे घेवून घरी आला आणि घरातील नळ सुरु केला. पण नळाचे पाणी बंद झाले होते. आज नदीवर आंघोळ करायचीच या त्याच्या निश्चयी विचारामुळे बादल्याही पाण्याने भरून ठेवायच्या राहून गेल्या होत्या.
        नारबा हिरमुसला. अंगावरील दुर्गंधीमुळे त्याचा जीव कासावीस झाला होता. कामावर जायला उशीर होणार या कल्पनेने त्याचा थरकाप झाला होता. विचार करायला नारबाला वेळ नव्हता. अजून पूर्ण उजाडले नव्हते. नारबा तसाच घराबाहेर पडला. त्याच्या  उजव्या बाजूकडील शेजारी त्याला प्रेमळ वाटले होते. धडधड्त्या अंत:करणाने नारबाने त्यांचा दरवाजा ठोठावला. आतून बायकी आवाज आला, कोण आहे?
           म्या नारबा ! नारबाने ओरडूनच सांगितले.
       सरस्वती काकींनी दरवाजा उघडला. बाहेर काळाकभिन्न अवतारातील माणसाला बघून त्या घाबरून किंचाळल्या. त्यांच्या किंकाळीने घरातील माणसे तर उठलीच, पण आजूबाजूची माणसेसुद्धा जागी झाली.
         नारबा ओरडून सांगू लागला, काकी, म्या नारबा हाय ! सर्वांनी नारबाला ओळखले. पण त्यांना प्रश्न पडला की, नारबा चिखलाने माखला कसा?
         काकी, नळाचा पाणी गेलाय, मला आंघुळीला पाणी पाहिजेल. नारबा म्हणाला.
         अरे पण तू चिखलात पडलास कसा? गर्दीतील शेलार काकांनी विचारले.
         पडलू नाय ! नदीत पवायला गेलतू ! पण नदीत लई घाण ! नारबाने नदीकडे अंगुलीनिर्देश करीत आपली व्यथा सांगितली.
         आता साऱ्यांच्या लक्षात प्रकार आला आणि अनेकजण ओरडले, अरे नारबा, ती नदी नव्हे, तो मुंबईचा गटार आहे !

No comments:

Post a Comment