Monday 29 August 2011

श्रद्धा

श्रद्धेमुळे माणूस पापभिरू बनतो. परमेश्वर आपल्याला दिसत नाही तरी ती एक अदृश्य शक्ती आहे असे मानणे ही एक श्रद्धा आहे. आपल्याकडून पाप घडले तर त्याचे भोग   आपल्याला भोगावे लागतील, या श्रद्धेमुळे मनुष्य पापापासून दूर राहतो. ईश्वर चिंतनाच्या श्रद्धेमुळे माणसाला आत्मशांती मिळते.पुंण्याच्या कल्पनेमुळे माणूस समाजसेवेचे व्रत स्वीकारतो. दुसऱ्यांच्या  उपयोगी पडतो. ईश्वर आहे या एकाच श्रद्धेमुळे मनुष्याला आणि समाजाला असे अनेक फायदे होतात.
जर मनुष्याने ही श्रद्धाच धुडकावून लावली तर अराजक माजेल.परमेश्वराचे अस्तित्व आणि पुंण्याची कल्पनाच नाकारली, तर मनुष्य स्वैराचारी होईल. माणसाला कशाचेच भय राहणार नसल्यामुळे तो मनाला येईल तसे दुर्वर्तनी कृत्य करीत राहील. म्हणूनच माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी श्रद्धेची अत्यंत आवश्यकता आहे.
परंतु अनेकांनी या श्रद्धेचे अंधश्रद्धेत परिवर्तन केले आहे. त्यामुळे अनेक अघोरी सैतानी कृत्ये घडत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. कोणी गुप्त धन मिळावे यासाठी मानवी बळी देतो, तर काहीजण स्वत:ला मुल व्हावे यासाठी दुसऱ्यांच्या बाळाला पळवून बळी देतात.सैतानाला लाजविणारे हे कृत्य पाहून आजच्या विज्ञान युगात माणूस अजूनही मागासलेला राहिल्याचे दिसून येते.
श्रद्धा माणसाला माणूस बनविते, तर अंधश्रद्धा माणसाला सैतान बनविते. श्रद्धेमुळे मन प्रसन्न व पवित्र बनते, तर अंधश्रद्धेमुळे अभद्र बनते. श्रद्धेमुळे सत्कृत्य घडतात, तर अंधश्रद्धेमुळे दुष्कृत्ये घडतात.
यासाठी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असावी परंतु  अंधश्रद्धा नसावी.  

सावधान

आजच्या विज्ञान युगातसुद्धा मुलीच्या जन्मापासूनच "मुलगी झाली हो" असा टाहो फोडला जात आहे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार या कारणास्तव तिचे बाल्यावस्थेतच शिक्षण खुंटले जात आहे. परक्याचे धन या सबबीखाली लहान वयातच तिला विवाह बंधनात जखडले जात आहे.
आपल्या देशात बालविवाहाची क्रूर समस्या आपली पाळेमुळे घट्ट रोवून बसली आहेत. बालविवाह कायद्याने गुन्हा ठरवूनसुध्दा सामाजिक रुढीच्या नावाखाली आजही असंख्य बालविवाह होत आहेत.
मुलीचा विवाह झाल्यावर डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखे समाधान मानणारे आईबाप मुलीच्या  पुढील आयुष्याकडे चक्क डोळेझाक करीत असतात.या डोळेझाकीमुळे  पुढे मुलीवर ओढवणाऱ्या दु:खाने रडण्याची पाळी या आईबापांवर येते.
मुलीचे अवयव सक्षम झालेले नसल्यामुळे वैवाहिक जीवनाचा तीला जाचक त्रास सहन करावा लागतो. आई वडिलांच्या अंगणात खेळणाऱ्या अजाण बालिकेला संसाराच्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. आईच्या पदराखाली लपणाऱ्या निरागस बालिकेला लहान वयातच आई व्हावे लागल्यामुळे तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे होणाऱ्या अपत्यावरसुद्धा वाईट परिणाम होतात.
आपली मुलगी सुखी पाहण्यासाठी आई वडिलांनी या खुळ्या समजुती झटकून टाकल्या पाहिजेत. विज्ञानयुगातील जगात जगण्यासाठी मुलीला चांगली शिकविली पाहिजे आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावरच तिचे लग्न केले पाहिजे. तेव्हाच नातवंडे खेळविण्याचे खरे सुख आई वडिलांना मिळू शकेल.

Saturday 27 August 2011

गणेशोत्सव

सर्व देवांमध्ये गणपतीला मोठा मान आहे.कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजेने होते. गणपती ज्ञानाचा, विद्देचा  आणि बुद्धीचा दैवत आहे. गणपतीच्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा पौराणिक ग्रंथात सापडतील.
महाभारत ग्रंथाच्या निर्मितीसाठी गुरु व्यासांनी गणपतीला प्रसन्न करून महाभारत लिहून घेतले असा उल्लेख आहे. याठिकाणीसुध्दा गणपतीच्या ज्ञानाचे आणि विद्वत्तेचे विविध पैलू दिसून येतात.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाच्या विचार प्रसाराला एक मोठे व्यासपीठ मिळाले. 
गणेशोत्सवाच्या काळात व्याख्याने, चर्चा, बैठका या माध्यमातून समाज जागृतीचे मोठे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळात घडले. पण स्वातंत्र्योत्तर काळात पुढे पुढे मात्र गणेशोत्सव हे समाज जागृतीचे उत्सव आहे याचा विसर पडू लागला. त्यामुळे समाज मनावर राष्ट्रभक्ती बिंबविणारी समरगीते,पराक्रमाचे पोवाडे ,भावगीते, भक्तिगीते दूर झाली आणि त्यांची जागा पाश्चात्य डिस्को संगीताने घेतली. गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा सुरु झाली. समाज प्रबोधन करणाऱ्या गणेशोत्सवात समाज विघातक गुटख्यांच्या जाहिराती दिसू लागल्या.
गणेशोत्सव समन्वय समिती स्थापन झाल्यापासून हे चित्र बदलत चालले आहे. आता पुन्हा एकदा गणेशोत्सव सामाजिक चळवळीचे केंद्र बनू पाहत आहे. या गोष्टीची आज अत्यंत गरज आहे. बालविवाह,लोकसंख्यावाढ,पर्यावरण,राष्ट्रीय एकात्मता,परकीय आक्रमण,नशाबंदी,भारतीय संस्कृतीचे संरक्षण,भृणहत्या,महागाई,भ्रष्टाचार,महिलावरील अत्याचार,हुंडाबळी अशा कितीतरी विषयावर गणेशोत्सव मंडळ जनजागृती करू शकतात.
स्वातंत्रपूर्व काळात स्वराज्य मिळविण्यासाठी कारणीभूत ठरलेला गणेशोत्सव,स्वातंत्र्योत्तर काळात सुराज्य निर्माण करण्यास उपयोगी पडावा अशी गणराया जवळ आपण सर्वांनी प्रार्थना करूया !
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ||

Saturday 20 August 2011

दिस जातील, दिस येतील

महागाईला कंटाळून एका कुटुंबाने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये आली होती. त्या दोन महिन्यामध्ये या कारणासाठी तीन आत्महत्या झाल्या होत्या. पूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यामुळे धक्के बसत होते. आता महागाईमुळे आत्महत्या ! म्हणजे जीवनाला मूल्यच राहिले नाही असे समीकरण झाले आहे.
जीवन अनमोल आहे. खडतर परिस्थितीत संकटाशी सामना करीत जगणारे लोक दुसऱ्यांसाठी आदर्श ठरतात. किड्यामुंगीसारखे का होईना, पण करोडो लोक भयानक परिस्थितीत जगत आहेत.
आपले जीवन संपविणे हा महागाईविरुद्धचा पर्याय नाही तर, आहे त्या परिस्थितीत  जीवन जगून महागाईविरुध्द संघर्ष करणे हा  त्यावरचा उपाय आहे. उत्पन्न १०० रुपये तर खर्च ९० रुपये हे गणित कसेही करून अंमलात आणलेच पाहिजे. तसं करताना खूप त्रास होईल, त्यावेळी " दिस जातील, दिस येतील - भोग सरेल, सुख येईल " या साध्या विचाराने आत्मबल वाढवून प्रत्येक काळरात्रीचा सामना करून येणाऱ्या उष:कालाची स्वप्न पाहत आनंदाने जीवन जगत राहूया !

Sunday 14 August 2011

भ्रष्टाचारी व्यवस्थापन

जसे एखाद्या शहरात प्रवेश करण्यासाठी टोल द्यावा लागतो, तसे आपल्या देशात जन्म घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पहिले पैसे भरून फॉर्म विकत घ्यावा लागतो. मग प्रत्येकजण यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. कोणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जन्म घेतो, तर कोणी पालिकेच्या किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जन्म घेतो. पण जन्माला येण्यासाठी फॉर्मच्या रूपाने का होईना पण पैसे द्यावेच लागतात.
आईच्या प्रेमळ सावलीच्या पदरातून दुडू दुडू बाहेर फिरायला लागल्यावर जीवघेण्या शैक्षणिक पद्धतीमुळे बोबड्या बोलातच विद्यामंदिरात दाखल होण्यासाठी बाळाच्या वजनापेक्षाही अधिक वजनाच्या रुपयांचे डोनेशन कंपल्सरी द्यावे लागते. शाळेमध्ये  प्रचंड संख्येने विद्यार्थी असल्यामुळे अभ्यास समजण्यासाठी भरमसाठ फी असलेल्या क्लासच्या आश्रयाला जावे लागते.
दहावीची सीमा ओलांडून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रचंड रांगा लावाव्या लागतात. तेथेही मोठमोठे वशिले लावावे लागतात. कॉलेजमध्ये शिकत असतानाच अठरा वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे स्वतंत्र भारताचे मताचे स्वातंत्र्य मिळतात. घटनेप्रमाणे आपले मत मांडण्याचे अधिकार प्राप्त होतात.पण ते फक्त कागदावर ! कॉलेजमध्ये आपले मत मांडायला स्वातंत्र्य नाही. एखाद्याने मत मांडलेच, तर तो उद्धट ठरतो. एटी केटी ची धमकी देत संधीसाधू प्राध्यापक विद्यार्थ्यांचा छळ करतात.
पदवी मिळाल्याचा आनंद होतो. पण नोकरीसाठी वणवण भटकावे लागते. तेव्हा लक्षात येते की,या कागदी पदवीला किंमत नाही. मग एखाद्या ठिकाणी लाच देवून नोकरी मिळवावी लागते. पुन्हा स्वतंत्र संसारासाठी जागेचा शोध घ्या ! स्वस्त घरासाठी फॉर्म भरा ! मग लौटरीची वाट बघा ! तेथेही नैराश्य ! शेवटी बिल्डर सांगेल त्या किंमतीत घरे घ्या. त्यासाठी प्रचंड व्याजाची कर्जे घ्या. घरात उपाशी राहिलो तरी चालेल, पण जप्ती होवू नये म्हणून घराच्या कर्जाचे हप्ते पहिले भरा.
जन्मापासून जगण्यापर्यंत या भ्रष्टाचारी व्यवस्थेने माणुसकीच्या छाताडावर पैशाला वैभव प्राप्त करून दिले आहे. स्वार्थाचे संस्कार नकळत समाजव्यवस्थेकडून दिले जात आहे. आपल्या पिढीने हे सोसले. पुढच्या पिढीला भ्रष्टाचारविरहीत जीवन जगण्यासाठी आजचे हे भ्रष्टाचारी व्यवस्थापन नष्ट करून टाकूया.              

Wednesday 3 August 2011

भयानकता

          गावाकडे जमीन नाही. असली तरी पिकत नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य. बापाला मजुरी नाही. त्यामुळे खायला अन्न नाही. घरातल्या चुलीवर काय शिजवू या विचारात रडत बसलेली आई. भुकेने कासावीस झालेली लहान भावंडे. हे सारे पाहून वयात आलेला तरुण तळमळतो. लहानपणापासून प्रेम केलेले गाव सोडून नोकरी करण्यासाठी शहरात येतो.
          शहरात आधीच बेकारांची संख्या जास्त. त्यात या तरुणाची भर. नोकरी नाही, आता  गावाला परत कसे जाणार? कारण तिकिटाला पैसे नाही. तसेच शहरात सुद्धा जगणार कसे? कारण खायला पैसे नाहीत.
          नाईलाजाने दुबळा असतो तो भिक मागतो. धडधाकट असतो तो हमाली करतो. शिकलेला तरुण मटक्याच्या अड्ड्यावर चिठ्या लिहितो आणि बंडखोर विचाराचा गुन्हेगारी टोळीकडे जातो.
          गुन्हेगारी टोळीकडे गेलेला हा तरुण जे मागून मिळत नाही ते जबरदस्तीने मिळवतो. पण त्यात तो एवढा गुंतून जातो की, प्रतिस्पर्धी टोळीकडून मारला जातो किंवा पोलिसांच्या एनकाउंटरमध्ये बळी पडतो.
          बापाचा मोडलेला संसार सावरण्यासाठी मोठ्या उमेदीने शहरात आलेल्या या तरुणाचे प्रेत गावाकडे परत जाते.
          हे कालचक्र सतत फिरतच आहे. हे कालचक्र रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. बेकारीवर आत्महत्या किंवा गुन्हेगारी हे उपाय नाहीत, हे या तरुणांना समजावून सांगितले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी एकही व्यक्ती नोकरीला नाही, त्या घरातील एका तरी व्यक्तीला सरकारने नोकरी दिली पाहिजे. जर नोकरी उपलब्ध नसेल तर त्याला रस्त्याच्या कडेला टपरी बांधून छोटा रोजगार करण्याची परवानगी दिली पाहिजे. या विषयाची मागणी सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येवून केली पाहिजे.  
     

Tuesday 2 August 2011

भोळसट नारबा

          मुंबईतल्या उपनगरातील ती बैठी खोली नारबाला खूप आवडली. कारण त्या खोलीसमोरून एक नदी वाहत होती. शिवाय नदीचा काठ सुद्धा मजबूत बांधलेला होता. नदीपासून त्या खोलीपर्यंत एक छोटासा रस्ता तयार झाला होता.
          नारबाला आपल्या गावच्या शेतातील घर आठवले. जवळूनच वाहणारी गावची नदी आठवली. नदीच्या पात्रात तासनतास सवंगड्यासोबत पोहणे आठवले.
          गावी प्रात:र्विधीसाठी लोटा घेऊन आडोशाला जावे लागे. येथे मात्र ती सोय घरातच असल्याचे पाहून तो मनात सुखावला होता. शिवाय आजूबाजूचे शेजारी चांगल्या स्वभावाचे दिसत होते. फक्त नदीचे पाणी खूपच गढूळ आणि घाणेरडे दिसत होते. तरीही नारबाने ती खोली घेण्याचा निर्णय पक्का केला. लवकरच सर्व व्यवहार पूर्ण करून नारबा त्या खोलीत राहायला आला.
          नारबा सरळ स्वभावाचा आणि धाडसी होता.गावच्या शेतीत कष्ट करूनही पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे भावकीतील एकाच्या ओळखीने मुंबईतील एका कारखान्यात त्याने नोकरी मिळवली होती. मुंबईत कोणीही ओळखीचे नसल्यामुळे राहण्याची मोठीच अडचण होती.रस्त्यावर झोपल्यावर चोरी होते, दगा फटका होतो. अशा ऐकीव बातम्यांमुळे त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईत खोली घेवून राहण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे नारबाने ही खोली घेतली होती.
          सकाळी कामावर जायचे असल्यामुळे नारबा जेवून लवकर झोपी गेला.सकाळी नळाच्या पाण्याच्या आवाजाने त्याला जाग आली.अजून पूर्णपणे उजाडले नव्हते. घरातल्या शौचालयामध्ये प्रात:र्विधी आटोपून नारबा टॉवेल घेवून मोठया खूशीतच घराबाहेर पडला. आज मनसोक्त नदीत डुंबायचे त्याने ठरविले होते.
        नदीजवळ येताच त्याच्या लक्षात आले की, नदी तुडूंब भरून वाहत आहे. परंतु नदीत कोणीच पोहत नव्हते. नदीजवळ जाताच नारबाला पाण्याची दुर्गंधी जाणवली.
          नारबाने त्या अंधारातच नदीच्या पाण्याकडे डोळे ताणून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, नदीच्या पाण्यातून घाण वाहत आहे आणि त्याचीच दुर्गंधी सुटली आहे.
       नारबाने विचार केला की, रात्री भरपूर पाऊस पडल्यामुळे सर्व घाण वाहून आली असावी. हिरमुसल्या मनाने नारबा घरी परतला आणि बादलीत जमा केलेल्या नळाच्या पाण्याने आंघोळ उरकून तो कामावर गेला.
        जवळजवळ पंधरा दिवस हा पहाटेचा क्रम सुरु होता. नळाच्या पाण्याच्या आवाजाने नारबा उठत होता आणि नदीपर्यंत जाऊन दुर्गंधीमुळे परत येत होता.
       आतापर्यंत नारबाची आजूबाजूच्या लोकांशी ओळख झाली होती. नारबाचे विनम्र वागणे पाहून शेजारी सुद्धा, एक चांगला शेजारी मिळाल्याने खुश होते. आपले शेजारी नदीवर पोहायला का जात नाहीत हा नारबाला सततचा प्रश्न सतावत होता. याविषयी शेजाऱ्यांना विचारण्याचे त्याने ठरविले होते. परंतू त्याला ते प्रशस्त न वाटल्यामुळे आजपर्यंत तो प्रश्न त्याच्या मनातच राहिला होता.
         नेहमीप्रमाणे पहाटे साडेचार वाजता नळाच्या पाण्याच्या आवाजाने नारबा जागा झाला. आज त्याने नदीत पोहायचेच हा ठाम निश्चय केला. दररोज नदीत पोहण्याची सवय असल्यामुळे गेला महिनाभर त्याला पोहायला मिळाले नसल्यामुळे तो कासावीस झाला होता.
       घरातील प्रात:र्विधी आटोपून तो नदीकाठी आला. पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्याला किळस आली. पण आज नदीत पोहायचेच या दृढ निश्चयाने त्याने दुर्गंधीकडे दुर्लक्ष केले. टॉवेल काठावर ठेवून त्याने अंगावरील कपडे काढले. अर्ध्या प्यनटीवर पाण्यात सुर मारण्याच्या तयारीत नारबा उभा राहिला.
       नारबा तसा पट्टीचा पोहणारा होता. गावच्या नदीला पूर आला असला, तरी नारबा आपला पोहण्याचा दिनक्रम चुकवत नसे.
       आतासुद्धा ही नदी तुडूंब वाहत होती. नारबाला पाण्याचा अंदाज नव्हता आणि नदीची खोलीही माहित नव्हती. परंतू त्याची त्याला फिकीर वाटत नव्हती, तो अडखळत होता फक्त पाण्याच्या दुर्गंधीमुळे.
        त्याने आजूबाजूला पाहिले. त्या अंधारात कोणीही दिसत नव्हते. नारबाने क्षणात निर्णय घेवून पाण्यात उडी मारली आणि त्याच्या लक्षात आले की, हे चिखल मिश्रीत पाणी आहे. नारबाने पोहण्याचा प्रयत्न केला पण त्याला पोहायला जमेना. सर्व अंग चिखलाने माखले होते. दुर्गंधीमुळे त्याला जीव जातोय असे वाटू लागले.
       नारबा आजूबाजूला स्वच्छ पाणी मिळेल या आशेने,त्या पाण्यातच इकडे तिकडे फिरत होता.पाण्याने आपल्या अंगावरील चिखलाची घाण साफ करण्याचा प्रयत्न करीत होता .पण अंग स्वच्छ होत नव्हते. उलट आणखी चिखलाचे थर बसत होते.
         अंधुक उजाडायला लागले होते. नारबाला आता स्पष्ट दिसत होते. त्याने आपल्या अंगाकडे पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपले अंग चिखलाने माखल्यामुळे काळेकभिन्न झाले आहे. नारबाच्या लक्षात आले या पाण्याने आपले अंग स्वच्छ होणार नाही. लोक जागे होण्यापूर्वी घरी जावून आंघोळ करावी या उद्देशाने तो ताबडतोब नदीबाहेर आला. आपले कपडे घेवून घरी आला आणि घरातील नळ सुरु केला. पण नळाचे पाणी बंद झाले होते. आज नदीवर आंघोळ करायचीच या त्याच्या निश्चयी विचारामुळे बादल्याही पाण्याने भरून ठेवायच्या राहून गेल्या होत्या.
        नारबा हिरमुसला. अंगावरील दुर्गंधीमुळे त्याचा जीव कासावीस झाला होता. कामावर जायला उशीर होणार या कल्पनेने त्याचा थरकाप झाला होता. विचार करायला नारबाला वेळ नव्हता. अजून पूर्ण उजाडले नव्हते. नारबा तसाच घराबाहेर पडला. त्याच्या  उजव्या बाजूकडील शेजारी त्याला प्रेमळ वाटले होते. धडधड्त्या अंत:करणाने नारबाने त्यांचा दरवाजा ठोठावला. आतून बायकी आवाज आला, कोण आहे?
           म्या नारबा ! नारबाने ओरडूनच सांगितले.
       सरस्वती काकींनी दरवाजा उघडला. बाहेर काळाकभिन्न अवतारातील माणसाला बघून त्या घाबरून किंचाळल्या. त्यांच्या किंकाळीने घरातील माणसे तर उठलीच, पण आजूबाजूची माणसेसुद्धा जागी झाली.
         नारबा ओरडून सांगू लागला, काकी, म्या नारबा हाय ! सर्वांनी नारबाला ओळखले. पण त्यांना प्रश्न पडला की, नारबा चिखलाने माखला कसा?
         काकी, नळाचा पाणी गेलाय, मला आंघुळीला पाणी पाहिजेल. नारबा म्हणाला.
         अरे पण तू चिखलात पडलास कसा? गर्दीतील शेलार काकांनी विचारले.
         पडलू नाय ! नदीत पवायला गेलतू ! पण नदीत लई घाण ! नारबाने नदीकडे अंगुलीनिर्देश करीत आपली व्यथा सांगितली.
         आता साऱ्यांच्या लक्षात प्रकार आला आणि अनेकजण ओरडले, अरे नारबा, ती नदी नव्हे, तो मुंबईचा गटार आहे !

आईसारखे दैवत नाही

        माणसाच्या तीन माता आहेत. एक, जन्म देणारी आई. दुसरी, उद्योग व्यवसाय म्हणजेच रोटी देणारी, आणि तिसरी, आपल्याला अंगाखांद्यावर खेळविणारी प्रिय भारतमाता.
           या तिन्ही मातेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्याचे कधीच अकल्याण होत नाही.

Sunday 31 July 2011

सोपा आणि रामबाण उपाय

           कालचक्र सतत फिरत असतो असे म्हणतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि  पुन्हा सकाळ, दुपार असे चक्र सतत फिरत राहते. हे कधीच थांबले नाही. अगदी कोणतीही भयानक गोष्ट घडली तरीही किंवा एखाद्या प्रमुख व्यक्तीचे देहावसान झाले तरीही ! जगात कोठेही काहीही घडत असले तरी कालचक्र सतत फिरतच राहतो.
दिवस, रात्री प्रमाणेच कालचक्राच्या रहाटगाडग्यात ऋतूनाही फिरावे लागते. हिवाळा ! उन्हाळा ! पावसाला ! पुन्हा हिवाळा !
           उन्हाळ्याच्या प्रखर दाहानंतर पावसाच्या येणाऱ्या सरी किती सुखद असतात याची कल्पना कवी मन असल्याशिवाय कळायची नाही. पावसाळ्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगाची कवींनी केलेली वर्णने मन उल्हसित करीत असतात.
           लहान मुलांची  " येरे येरे पावसा " ही साद घरातील थोरामोठ्यानांही मोहवित असते. साचलेल्या पाण्यात कागदी होड्या तरंगत ठेवण्याची त्यांची निरागस धडपड पाहून वयोवृद्धही आपल्या बाल्यावस्थेतील जीवनात पोचलेले असतात. पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार झाडे झुडपे किंवा आकाशातील इंद्रधनुष्य निसर्गाची शोभा द्विगुणीत करीत असतात. कालचक्रामध्ये वर्षभरात या गोष्टी एकापाठोपाठ येत असतात आणि जात असतात.
          कालचक्र नेहमीच्या गतीने फिरत असला तरी आता मात्र येणाऱ्या ऋतूंमध्ये फरक पडलेला जाणवतो. नोव्हेंबर, डिसेंबरमधील कडाक्याच्या थंडीच्या वेळेला अंगामधून घामाच्या धारा येतील एवढे गरम होत असते. तर पाऊस अचानक अदृश्य होत असल्यामुळे श्रावणमासी हर्ष मानसी या अवस्थेत बदल होवून श्रावणातसुद्धा उदास वाटत असते. दरवर्षी कुठेतरी दुष्काळ पडत असतोच ! मुंबईतसुद्धा पाणी टंचाई असते. अशा वातावरणात माणसाला वाटणाऱ्या उदासपणामुळे किंवा दुष्काळ, टंचाईमुळे तो पावसाला दोष देत राहतो. पण माणूस आपला दोष मात्र विसरतो. 
          कालचक्र आजपर्यंत नेहमीच्या गतीने फिरत आहे, मग निसर्गात बदल का झाला याचा माणूस विचार करीत नाही. वाढणारे प्रदूषण, ढासळणारे पर्यावरण, भुईसपाट होणारे डोंगर आणि झाडे ! बुजली जाणारी तलाव आणि खाडी ! वायू आणि जल प्रदूषित करणारी रसायने ! या सर्व गोष्टीमुळे माणसाने निसर्गावर किती अन्याय केला आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आपण केलेले आपल्यावरच उलटते या चक्राप्रमाणे आता माणसाचेच आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.
       यावर उपाय शोधण्यासाठी आता संशोधन चालले आहे. चर्चासत्रे, बैठका होत आहेत. पण यावर सोपा आणि रामबाण उपाय एकच ' झाडे लावा, झाडे जगवा ' हा मंत्र आणि त्याप्रमाणे अंमलात येणारे तंत्र !

Friday 29 July 2011

पिल्लांना पंख फुटले

         जागेच्या टंचाईमुळे मी मुंबईच्या उपनगरात राहायला गेलो. जागा जुनी असल्यामुळे दुरुस्त  करणे आवश्यक होते. कॉन्ट्रक्टरला बोलावून दुरुस्तीचे काम करायला सांगितले. भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी, कॉन्ट्रक्टरने भिंत फोडण्याचे काम सुरु केले होते.
       खोलीच्या छपराला लागू असलेली भिंत फोडताना चिवचिव, चिवचिव असा आवाज येवू लागला. योगायोगाने मी त्यावेळी तेथे हजर होतो. मी काम करणाऱ्या कामगारांना काम थांबविण्यास सांगितले आणि अंदाज घेतला. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, छताच्या बाजूने भिंतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.त्यामध्ये चिमणीची पिल्ले आहेत. मी विचार केला की, ही भिंत फोडली तर पिल्लांचा आसरा निघून जाईल. पिल्ले उघड्यावर पडतील.
         मला आठवले, आई आपल्या लहान बाळाला कडेवर घेवून भात भरवताना, हा घास चिऊचा ! असा उगाचच कल्पनेचा भास निर्माण करते. माझ्या मनात विचार आला की, माझी मुले इथे राहावयास आल्यावर, त्यानाही खेळायला चिऊ आणि चिऊची पिल्ले मिळतील.
          मी कामगारांना तेथील काम थांबवून इतर काम करायला सांगितले. काम सुरु झाले, पण घाबरलेल्या पिल्लांची चिवचिव चालूच होती.
            मी मनाशी निर्धार केला की, आपली खोली नीट दुरुस्त झाली नाही तरी चालेल, पण या पिल्लांचा आसरा तोडायचा नाही. तेवढ्यात अन्न शोधायला गेलेली चिमणा चिमणी सुद्धा आली होती. त्यांचे आपल्या पिल्लांपर्यंत जाणे आणि खिडकीपर्यंत येणे सतत चालूच होते. त्यांच्या चिवचिवाटाने खोली संगीतमय झाली होती.
           कामगारांचे इतर ठिकाणी काम सुरु झाले होते. तेवढ्यात एक पिल्लू घाबरलेल्या अवस्थेतच पोकळीतून बाहेर आले. आईशी चिवचिवाट साधत असतानाच खाली पडले. खाली पडताना त्याच्या पंखांची फडफडाट झाली होती. पण त्याला उडता येत नसल्यामुळे ते खाली फरशीवर पडले. उंचावरून खाली पडलेले पिल्लू पाहून, माझे मन कळवळले. मी सर्व कामगारांना पुन्हा काम करण्याचे थांबविण्यास सांगितले.
        मला प्रश्न पडला की, या पिल्लाचे काय करू ? त्याला उचलून भिंतीमधील पोकळीत ठेवावे, तर त्याचे जातभाई, माणसाने शिवला म्हणून त्याला मारून टाकतील. आणि असेच खाली ठेवले तर कुत्रे मांजर त्याच्यावर झडप घालतील. मी मोठ्या अडचणीत पडलो. वर त्याच्या आई वडिलांनी, चिमणा चिमणीने चिवचिवाटाचा आकांत मांडला होता.
        शेवटी मी एक कागदी पुठ्ठा घेतला. तो फरशीला घासत नेवून त्या पिल्लाला पुठ्ठ्यावर घेतले आणि शिडी चढून त्याला त्या छताजवळच्या पोकळीत ठेवू लागलो. तेवढ्यात पिल्लाने हालचाल केली आणि तो त्या पुठ्ठ्यावरून उडाला. पण उडता येत नसल्यामुळे पुन्हा खाली पडला. मी शिडीवरून परत खाली उतरलो. पुन्हा त्याला पुठ्यावर घेतले आणि शिडीवर चढलो. पण पुन्हा पुन्हा तोच प्रकार होवू लागला.
           सारे कामगार माझ्याकडे, मुर्खाकडे पहावे तसे पहात होते. पण मला त्याची फिकीर नव्हती. माझ्या 
मनात फक्त एकच विचार ! त्या पिल्लाला त्याच्या जागेत सुखरूप ठेवायचे.
         प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे माझ्या प्रयत्नाला यश आले. ते पिल्लू त्या भिंतीच्या पोकळीत गेले. मघापासून सुरु असलेली चिवचिवाट थांबली. कामगारांना
" तेथे काम करू नका " अशी सूचना देवून मी घरी आलो.
      खोलीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना मी अनेकवेळा तेथे गेलो. त्यावेळी आवर्जून माझे लक्ष त्या छताजवळील भिंतीकडे जायचे. मी बराच वेळ त्या भिंतीकडे पहात बसायचो.
          चिमणी चोचीत अन्न घेवून यायची. पिल्लांचा चिवचिवाट चालू असताना, पिल्लांच्या तोंडात अन्न 
भरवून, पुन्हा अन्न शोधण्यासाठी निघून जायची. मला मोठी गम्मत वाटायची.
         मी माझ्या लहान मुलांना म्हणालो, आपल्या नवीन घरात चिमणीचे सुद्धा एक घर आहे. तिची बाळेसुद्धा तिथे आहेत.
       घराचे काम पूर्ण झाले. वास्तूशांती करून आम्ही त्या घरात रहायला गेलो. माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला, पप्पा ! कुठे आहेत हो  चिमणीची बाळे ?
        मी वर छताकडे पाहिले. तेथे सारे शांत दिसत होते. चिवचिवाट नाहीच, पण साधा चिवही ऐकायला येत नव्हता. शिडीवर चढून, वर जावून बघण्याचा मला धीर होत नव्हता. मी बराच वेळ वाट पाहिली. एक तास, दोन तास, एक रात्र निघून गेली. पण पिल्लांचा चिवचिवाट ऐकायला येत नव्हता. आणि अन्न शोधायला गेलेली चिमणा चिमणी सुद्धा नजरेला पडत नव्हती. तेव्हा माझ्या लक्षात आले की, पिल्लांना पंख फुटले आणि ते मोकळ्या आकाशात हिंडायला निघून गेली.
         मुले मला सतत विचारीत होती, पप्पा, कुठे आहेत चिमणीची बाळे ?
        मी मूक झालो. स्वत:ला नुकसान सोसून केलेले उपकार, अश्रूच्या रूपाने डोळ्यात जमा होत होते. पिल्लांना पंख फुटले होते आणि त्यांची गरज संपली होती.

Thursday 28 July 2011

दुरून डोंगर साजरे

          डोंगर कसाही असू दे. तो दुरूनच सुंदर दिसतो. डोंगर काळ्या पत्थराचा असू दे किंवा लाल मातीचा ! हिरव्या वृक्षराजीने नटलेला असू दे किंवा बर्फाने आच्छादलेला ! त्याच्यावर एखादे मंदिर असू दे किंवा झोपड्या ! कसाही असला तरी दुरून डोंगर नयनरम्यच दिसतो.
       पण डोंगराच्या जवळ गेल्यावर हेच मनोहर दृश्य फसवे दिसते.आनंद लुटण्यासाठी आलेले लोक आपली फसगत झाली या दु:खानेच परत जातात.
        पण खरा आनंद डोंगराच्या माथ्यावर असतो. तो उपभोगण्यासाठी डोंगर चढण्याची जिद्द पाहिजे. 
येणाऱ्या संकटाशी सामना करण्याची हिम्मत पाहिजे.
      मग डोंगर माथ्यावर पोहचल्यावर अंगाला भिडणारी सुखद हवा आणि नेत्राला सुखावणारी अष्ट दिशेची निसर्गशोभा अवर्णनीय असते.
      जीवनातला एक वेगळा आनंद आणि सुख उपभोगल्याचा अनुभव त्यावेळी आपल्याला लाभतो.
    

Wednesday 27 July 2011

खरे सुख

        जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे रामदास स्वामींनी साडेतीनशे वर्षापूर्वी विचारले आहे.
            या जगरहाटीमध्ये माणसाच्या सुखाविषयी नेमकी कल्पना कोणीही करू शकलेला  नाही. किंवा रामदास स्वामींच्या प्रश्नाचे उत्तरही देवू शकलेला नाही.
            अनेक संतानी प्रबोधन करतांना सांगितले आहे की, समाधानातच  सुख आहे. समाधानी माणूस सुखी असतो.
            पण हे समाधानच माणसाजवळ टिकत नाही. त्यामुळे माणूस दु:खी होतो. याचे कारण माणसाची वर बघण्याची वृत्ती.
            मनुष्य आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या किंवा श्रीमंतीचा देखावा करणाऱ्याकडे सतत पहात रहातो.आणि त्याच्याकडे जे आहे, ते माझ्याकडे नाही या विचारामुळे विनाकारण दु:खी होतो .
            समाधान मिळविण्यासाठी आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे पाहिले पाहिजे. त्याच्याकडे जे नाही, ते माझ्याकडे आहे या समाधानातच खरे सुख लपले आहे. 

Tuesday 26 July 2011

माणसाचे जीवन

बुध्दिवन्तांमध्येच वाद निघाला राज्यपक्षाचा
हरीयल असावा की,रानपिंगळा या विषयाचा
आपल्या वैभवी देशाचेच दुर्देव झाले असे
ऐषआरामी लोक निरुपयोगी विषयात भांडत बसे
कोणाला चावणाऱ्या बेवारसी कुत्र्याची कीव
कोण धावतो वाचविण्या नरभक्षक वाघाचा जीव
पूजा पूज्य म्हणुनी सेवा करतील गरीब गायीची
गाय प्रतिक ज्यांचे, विटंबना करतील त्या गरिबांची
माणुसकीची संस्कृती आपली जगा दाखवी अभिमान
माणूस मात्र येथे कुजतो कवडीमोल ठरे त्याचा प्राण

Sunday 24 July 2011

कुलस्वामिनी भवानी आई

माझी आई कुलस्वामिनी
विश्वमाता जय भवानी
भक्तासाठी वरद दायिनी
कीर्ती तीची तिन्ही लोकी

अष्टभुजा अन शस्त्रधारीणी
दुष्ट राक्षसांची संहारीनी
भक्तांची संकटे निवारीणी
तिच्या चरणी नमन माझे

आई तुझा मला अभिमान
तुझ्यामुळे तारीले माझे जीवन
संकटात करतेस तू रक्षण
मजवर तुझे उपकार मोठे

सामर्थ्य मोठे तुझे आई
शिवरायांना तू तलवार देई
स्वराज्य मग साकार होई
जनमानसे सुखी झाली

सर्व देव करी पूजा तुझी
नष्ट होती संकटाची ओझी
दु:ख दैन्य दूर होई माझी
कृपा अशी सतत राहू दे

आदिमाया तू पार्वती
भक्तांसाठी रूपे घेती
संकटे सारी भस्म होती
नाम तुझे घेता माते

तूच दुर्गा तूच अंबाई
तूच जगदंबा तूच वाघजाई
तूच कालिका तू तुळजाई
भक्तांसाठी ही अनेक रूपे

संकटांत तू धावत येशी
भक्ताला वरचेवर झेलशी
प्रेम आशीर्वाद तुझपाशी
भक्तांना सतत लाभे

मी अज्ञान बालक आई
ना समजे मजला काही
चुकून मजकडून पातक होई
दया क्षमा मला करावी
                                                             

Tuesday 19 July 2011

का?

फुलणाऱ्या पाकळीवर
अळी का दिसावी
ममतेच्या भाकरीवर
विषवल्ली का पडावी

रिमझिम पावसात
वीज का पडावी
प्रसन्न पहाटेस
नीज का उरावी

पक्षांच्या घरट्याची
फांदी का मोडावी
धावणाऱ्या छकुल्यास
ठेच का लागावी

सुखी संसारात
दु:ख का शिरावे
निष्पापांच्या आयुष्यात
स्फोट का घडावे.