Sunday, 31 July 2011

सोपा आणि रामबाण उपाय

           कालचक्र सतत फिरत असतो असे म्हणतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि  पुन्हा सकाळ, दुपार असे चक्र सतत फिरत राहते. हे कधीच थांबले नाही. अगदी कोणतीही भयानक गोष्ट घडली तरीही किंवा एखाद्या प्रमुख व्यक्तीचे देहावसान झाले तरीही ! जगात कोठेही काहीही घडत असले तरी कालचक्र सतत फिरतच राहतो.
दिवस, रात्री प्रमाणेच कालचक्राच्या रहाटगाडग्यात ऋतूनाही फिरावे लागते. हिवाळा ! उन्हाळा ! पावसाला ! पुन्हा हिवाळा !
           उन्हाळ्याच्या प्रखर दाहानंतर पावसाच्या येणाऱ्या सरी किती सुखद असतात याची कल्पना कवी मन असल्याशिवाय कळायची नाही. पावसाळ्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगाची कवींनी केलेली वर्णने मन उल्हसित करीत असतात.
           लहान मुलांची  " येरे येरे पावसा " ही साद घरातील थोरामोठ्यानांही मोहवित असते. साचलेल्या पाण्यात कागदी होड्या तरंगत ठेवण्याची त्यांची निरागस धडपड पाहून वयोवृद्धही आपल्या बाल्यावस्थेतील जीवनात पोचलेले असतात. पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार झाडे झुडपे किंवा आकाशातील इंद्रधनुष्य निसर्गाची शोभा द्विगुणीत करीत असतात. कालचक्रामध्ये वर्षभरात या गोष्टी एकापाठोपाठ येत असतात आणि जात असतात.
          कालचक्र नेहमीच्या गतीने फिरत असला तरी आता मात्र येणाऱ्या ऋतूंमध्ये फरक पडलेला जाणवतो. नोव्हेंबर, डिसेंबरमधील कडाक्याच्या थंडीच्या वेळेला अंगामधून घामाच्या धारा येतील एवढे गरम होत असते. तर पाऊस अचानक अदृश्य होत असल्यामुळे श्रावणमासी हर्ष मानसी या अवस्थेत बदल होवून श्रावणातसुद्धा उदास वाटत असते. दरवर्षी कुठेतरी दुष्काळ पडत असतोच ! मुंबईतसुद्धा पाणी टंचाई असते. अशा वातावरणात माणसाला वाटणाऱ्या उदासपणामुळे किंवा दुष्काळ, टंचाईमुळे तो पावसाला दोष देत राहतो. पण माणूस आपला दोष मात्र विसरतो. 
          कालचक्र आजपर्यंत नेहमीच्या गतीने फिरत आहे, मग निसर्गात बदल का झाला याचा माणूस विचार करीत नाही. वाढणारे प्रदूषण, ढासळणारे पर्यावरण, भुईसपाट होणारे डोंगर आणि झाडे ! बुजली जाणारी तलाव आणि खाडी ! वायू आणि जल प्रदूषित करणारी रसायने ! या सर्व गोष्टीमुळे माणसाने निसर्गावर किती अन्याय केला आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आपण केलेले आपल्यावरच उलटते या चक्राप्रमाणे आता माणसाचेच आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.
       यावर उपाय शोधण्यासाठी आता संशोधन चालले आहे. चर्चासत्रे, बैठका होत आहेत. पण यावर सोपा आणि रामबाण उपाय एकच ' झाडे लावा, झाडे जगवा ' हा मंत्र आणि त्याप्रमाणे अंमलात येणारे तंत्र !

Friday, 29 July 2011

पिल्लांना पंख फुटले

         जागेच्या टंचाईमुळे मी मुंबईच्या उपनगरात राहायला गेलो. जागा जुनी असल्यामुळे दुरुस्त  करणे आवश्यक होते. कॉन्ट्रक्टरला बोलावून दुरुस्तीचे काम करायला सांगितले. भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी, कॉन्ट्रक्टरने भिंत फोडण्याचे काम सुरु केले होते.
       खोलीच्या छपराला लागू असलेली भिंत फोडताना चिवचिव, चिवचिव असा आवाज येवू लागला. योगायोगाने मी त्यावेळी तेथे हजर होतो. मी काम करणाऱ्या कामगारांना काम थांबविण्यास सांगितले आणि अंदाज घेतला. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, छताच्या बाजूने भिंतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.त्यामध्ये चिमणीची पिल्ले आहेत. मी विचार केला की, ही भिंत फोडली तर पिल्लांचा आसरा निघून जाईल. पिल्ले उघड्यावर पडतील.
         मला आठवले, आई आपल्या लहान बाळाला कडेवर घेवून भात भरवताना, हा घास चिऊचा ! असा उगाचच कल्पनेचा भास निर्माण करते. माझ्या मनात विचार आला की, माझी मुले इथे राहावयास आल्यावर, त्यानाही खेळायला चिऊ आणि चिऊची पिल्ले मिळतील.
          मी कामगारांना तेथील काम थांबवून इतर काम करायला सांगितले. काम सुरु झाले, पण घाबरलेल्या पिल्लांची चिवचिव चालूच होती.
            मी मनाशी निर्धार केला की, आपली खोली नीट दुरुस्त झाली नाही तरी चालेल, पण या पिल्लांचा आसरा तोडायचा नाही. तेवढ्यात अन्न शोधायला गेलेली चिमणा चिमणी सुद्धा आली होती. त्यांचे आपल्या पिल्लांपर्यंत जाणे आणि खिडकीपर्यंत येणे सतत चालूच होते. त्यांच्या चिवचिवाटाने खोली संगीतमय झाली होती.
           कामगारांचे इतर ठिकाणी काम सुरु झाले होते. तेवढ्यात एक पिल्लू घाबरलेल्या अवस्थेतच पोकळीतून बाहेर आले. आईशी चिवचिवाट साधत असतानाच खाली पडले. खाली पडताना त्याच्या पंखांची फडफडाट झाली होती. पण त्याला उडता येत नसल्यामुळे ते खाली फरशीवर पडले. उंचावरून खाली पडलेले पिल्लू पाहून, माझे मन कळवळले. मी सर्व कामगारांना पुन्हा काम करण्याचे थांबविण्यास सांगितले.
        मला प्रश्न पडला की, या पिल्लाचे काय करू ? त्याला उचलून भिंतीमधील पोकळीत ठेवावे, तर त्याचे जातभाई, माणसाने शिवला म्हणून त्याला मारून टाकतील. आणि असेच खाली ठेवले तर कुत्रे मांजर त्याच्यावर झडप घालतील. मी मोठ्या अडचणीत पडलो. वर त्याच्या आई वडिलांनी, चिमणा चिमणीने चिवचिवाटाचा आकांत मांडला होता.
        शेवटी मी एक कागदी पुठ्ठा घेतला. तो फरशीला घासत नेवून त्या पिल्लाला पुठ्ठ्यावर घेतले आणि शिडी चढून त्याला त्या छताजवळच्या पोकळीत ठेवू लागलो. तेवढ्यात पिल्लाने हालचाल केली आणि तो त्या पुठ्ठ्यावरून उडाला. पण उडता येत नसल्यामुळे पुन्हा खाली पडला. मी शिडीवरून परत खाली उतरलो. पुन्हा त्याला पुठ्यावर घेतले आणि शिडीवर चढलो. पण पुन्हा पुन्हा तोच प्रकार होवू लागला.
           सारे कामगार माझ्याकडे, मुर्खाकडे पहावे तसे पहात होते. पण मला त्याची फिकीर नव्हती. माझ्या 
मनात फक्त एकच विचार ! त्या पिल्लाला त्याच्या जागेत सुखरूप ठेवायचे.
         प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे माझ्या प्रयत्नाला यश आले. ते पिल्लू त्या भिंतीच्या पोकळीत गेले. मघापासून सुरु असलेली चिवचिवाट थांबली. कामगारांना
" तेथे काम करू नका " अशी सूचना देवून मी घरी आलो.
      खोलीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना मी अनेकवेळा तेथे गेलो. त्यावेळी आवर्जून माझे लक्ष त्या छताजवळील भिंतीकडे जायचे. मी बराच वेळ त्या भिंतीकडे पहात बसायचो.
          चिमणी चोचीत अन्न घेवून यायची. पिल्लांचा चिवचिवाट चालू असताना, पिल्लांच्या तोंडात अन्न 
भरवून, पुन्हा अन्न शोधण्यासाठी निघून जायची. मला मोठी गम्मत वाटायची.
         मी माझ्या लहान मुलांना म्हणालो, आपल्या नवीन घरात चिमणीचे सुद्धा एक घर आहे. तिची बाळेसुद्धा तिथे आहेत.
       घराचे काम पूर्ण झाले. वास्तूशांती करून आम्ही त्या घरात रहायला गेलो. माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला, पप्पा ! कुठे आहेत हो  चिमणीची बाळे ?
        मी वर छताकडे पाहिले. तेथे सारे शांत दिसत होते. चिवचिवाट नाहीच, पण साधा चिवही ऐकायला येत नव्हता. शिडीवर चढून, वर जावून बघण्याचा मला धीर होत नव्हता. मी बराच वेळ वाट पाहिली. एक तास, दोन तास, एक रात्र निघून गेली. पण पिल्लांचा चिवचिवाट ऐकायला येत नव्हता. आणि अन्न शोधायला गेलेली चिमणा चिमणी सुद्धा नजरेला पडत नव्हती. तेव्हा माझ्या लक्षात आले की, पिल्लांना पंख फुटले आणि ते मोकळ्या आकाशात हिंडायला निघून गेली.
         मुले मला सतत विचारीत होती, पप्पा, कुठे आहेत चिमणीची बाळे ?
        मी मूक झालो. स्वत:ला नुकसान सोसून केलेले उपकार, अश्रूच्या रूपाने डोळ्यात जमा होत होते. पिल्लांना पंख फुटले होते आणि त्यांची गरज संपली होती.

Thursday, 28 July 2011

दुरून डोंगर साजरे

          डोंगर कसाही असू दे. तो दुरूनच सुंदर दिसतो. डोंगर काळ्या पत्थराचा असू दे किंवा लाल मातीचा ! हिरव्या वृक्षराजीने नटलेला असू दे किंवा बर्फाने आच्छादलेला ! त्याच्यावर एखादे मंदिर असू दे किंवा झोपड्या ! कसाही असला तरी दुरून डोंगर नयनरम्यच दिसतो.
       पण डोंगराच्या जवळ गेल्यावर हेच मनोहर दृश्य फसवे दिसते.आनंद लुटण्यासाठी आलेले लोक आपली फसगत झाली या दु:खानेच परत जातात.
        पण खरा आनंद डोंगराच्या माथ्यावर असतो. तो उपभोगण्यासाठी डोंगर चढण्याची जिद्द पाहिजे. 
येणाऱ्या संकटाशी सामना करण्याची हिम्मत पाहिजे.
      मग डोंगर माथ्यावर पोहचल्यावर अंगाला भिडणारी सुखद हवा आणि नेत्राला सुखावणारी अष्ट दिशेची निसर्गशोभा अवर्णनीय असते.
      जीवनातला एक वेगळा आनंद आणि सुख उपभोगल्याचा अनुभव त्यावेळी आपल्याला लाभतो.
    

Wednesday, 27 July 2011

खरे सुख

        जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे रामदास स्वामींनी साडेतीनशे वर्षापूर्वी विचारले आहे.
            या जगरहाटीमध्ये माणसाच्या सुखाविषयी नेमकी कल्पना कोणीही करू शकलेला  नाही. किंवा रामदास स्वामींच्या प्रश्नाचे उत्तरही देवू शकलेला नाही.
            अनेक संतानी प्रबोधन करतांना सांगितले आहे की, समाधानातच  सुख आहे. समाधानी माणूस सुखी असतो.
            पण हे समाधानच माणसाजवळ टिकत नाही. त्यामुळे माणूस दु:खी होतो. याचे कारण माणसाची वर बघण्याची वृत्ती.
            मनुष्य आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या किंवा श्रीमंतीचा देखावा करणाऱ्याकडे सतत पहात रहातो.आणि त्याच्याकडे जे आहे, ते माझ्याकडे नाही या विचारामुळे विनाकारण दु:खी होतो .
            समाधान मिळविण्यासाठी आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे पाहिले पाहिजे. त्याच्याकडे जे नाही, ते माझ्याकडे आहे या समाधानातच खरे सुख लपले आहे. 

Tuesday, 26 July 2011

माणसाचे जीवन

बुध्दिवन्तांमध्येच वाद निघाला राज्यपक्षाचा
हरीयल असावा की,रानपिंगळा या विषयाचा
आपल्या वैभवी देशाचेच दुर्देव झाले असे
ऐषआरामी लोक निरुपयोगी विषयात भांडत बसे
कोणाला चावणाऱ्या बेवारसी कुत्र्याची कीव
कोण धावतो वाचविण्या नरभक्षक वाघाचा जीव
पूजा पूज्य म्हणुनी सेवा करतील गरीब गायीची
गाय प्रतिक ज्यांचे, विटंबना करतील त्या गरिबांची
माणुसकीची संस्कृती आपली जगा दाखवी अभिमान
माणूस मात्र येथे कुजतो कवडीमोल ठरे त्याचा प्राण

Sunday, 24 July 2011

कुलस्वामिनी भवानी आई

माझी आई कुलस्वामिनी
विश्वमाता जय भवानी
भक्तासाठी वरद दायिनी
कीर्ती तीची तिन्ही लोकी

अष्टभुजा अन शस्त्रधारीणी
दुष्ट राक्षसांची संहारीनी
भक्तांची संकटे निवारीणी
तिच्या चरणी नमन माझे

आई तुझा मला अभिमान
तुझ्यामुळे तारीले माझे जीवन
संकटात करतेस तू रक्षण
मजवर तुझे उपकार मोठे

सामर्थ्य मोठे तुझे आई
शिवरायांना तू तलवार देई
स्वराज्य मग साकार होई
जनमानसे सुखी झाली

सर्व देव करी पूजा तुझी
नष्ट होती संकटाची ओझी
दु:ख दैन्य दूर होई माझी
कृपा अशी सतत राहू दे

आदिमाया तू पार्वती
भक्तांसाठी रूपे घेती
संकटे सारी भस्म होती
नाम तुझे घेता माते

तूच दुर्गा तूच अंबाई
तूच जगदंबा तूच वाघजाई
तूच कालिका तू तुळजाई
भक्तांसाठी ही अनेक रूपे

संकटांत तू धावत येशी
भक्ताला वरचेवर झेलशी
प्रेम आशीर्वाद तुझपाशी
भक्तांना सतत लाभे

मी अज्ञान बालक आई
ना समजे मजला काही
चुकून मजकडून पातक होई
दया क्षमा मला करावी
                                                             

Tuesday, 19 July 2011

का?

फुलणाऱ्या पाकळीवर
अळी का दिसावी
ममतेच्या भाकरीवर
विषवल्ली का पडावी

रिमझिम पावसात
वीज का पडावी
प्रसन्न पहाटेस
नीज का उरावी

पक्षांच्या घरट्याची
फांदी का मोडावी
धावणाऱ्या छकुल्यास
ठेच का लागावी

सुखी संसारात
दु:ख का शिरावे
निष्पापांच्या आयुष्यात
स्फोट का घडावे.