Friday, 29 July 2011

पिल्लांना पंख फुटले

         जागेच्या टंचाईमुळे मी मुंबईच्या उपनगरात राहायला गेलो. जागा जुनी असल्यामुळे दुरुस्त  करणे आवश्यक होते. कॉन्ट्रक्टरला बोलावून दुरुस्तीचे काम करायला सांगितले. भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी, कॉन्ट्रक्टरने भिंत फोडण्याचे काम सुरु केले होते.
       खोलीच्या छपराला लागू असलेली भिंत फोडताना चिवचिव, चिवचिव असा आवाज येवू लागला. योगायोगाने मी त्यावेळी तेथे हजर होतो. मी काम करणाऱ्या कामगारांना काम थांबविण्यास सांगितले आणि अंदाज घेतला. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, छताच्या बाजूने भिंतीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.त्यामध्ये चिमणीची पिल्ले आहेत. मी विचार केला की, ही भिंत फोडली तर पिल्लांचा आसरा निघून जाईल. पिल्ले उघड्यावर पडतील.
         मला आठवले, आई आपल्या लहान बाळाला कडेवर घेवून भात भरवताना, हा घास चिऊचा ! असा उगाचच कल्पनेचा भास निर्माण करते. माझ्या मनात विचार आला की, माझी मुले इथे राहावयास आल्यावर, त्यानाही खेळायला चिऊ आणि चिऊची पिल्ले मिळतील.
          मी कामगारांना तेथील काम थांबवून इतर काम करायला सांगितले. काम सुरु झाले, पण घाबरलेल्या पिल्लांची चिवचिव चालूच होती.
            मी मनाशी निर्धार केला की, आपली खोली नीट दुरुस्त झाली नाही तरी चालेल, पण या पिल्लांचा आसरा तोडायचा नाही. तेवढ्यात अन्न शोधायला गेलेली चिमणा चिमणी सुद्धा आली होती. त्यांचे आपल्या पिल्लांपर्यंत जाणे आणि खिडकीपर्यंत येणे सतत चालूच होते. त्यांच्या चिवचिवाटाने खोली संगीतमय झाली होती.
           कामगारांचे इतर ठिकाणी काम सुरु झाले होते. तेवढ्यात एक पिल्लू घाबरलेल्या अवस्थेतच पोकळीतून बाहेर आले. आईशी चिवचिवाट साधत असतानाच खाली पडले. खाली पडताना त्याच्या पंखांची फडफडाट झाली होती. पण त्याला उडता येत नसल्यामुळे ते खाली फरशीवर पडले. उंचावरून खाली पडलेले पिल्लू पाहून, माझे मन कळवळले. मी सर्व कामगारांना पुन्हा काम करण्याचे थांबविण्यास सांगितले.
        मला प्रश्न पडला की, या पिल्लाचे काय करू ? त्याला उचलून भिंतीमधील पोकळीत ठेवावे, तर त्याचे जातभाई, माणसाने शिवला म्हणून त्याला मारून टाकतील. आणि असेच खाली ठेवले तर कुत्रे मांजर त्याच्यावर झडप घालतील. मी मोठ्या अडचणीत पडलो. वर त्याच्या आई वडिलांनी, चिमणा चिमणीने चिवचिवाटाचा आकांत मांडला होता.
        शेवटी मी एक कागदी पुठ्ठा घेतला. तो फरशीला घासत नेवून त्या पिल्लाला पुठ्ठ्यावर घेतले आणि शिडी चढून त्याला त्या छताजवळच्या पोकळीत ठेवू लागलो. तेवढ्यात पिल्लाने हालचाल केली आणि तो त्या पुठ्ठ्यावरून उडाला. पण उडता येत नसल्यामुळे पुन्हा खाली पडला. मी शिडीवरून परत खाली उतरलो. पुन्हा त्याला पुठ्यावर घेतले आणि शिडीवर चढलो. पण पुन्हा पुन्हा तोच प्रकार होवू लागला.
           सारे कामगार माझ्याकडे, मुर्खाकडे पहावे तसे पहात होते. पण मला त्याची फिकीर नव्हती. माझ्या 
मनात फक्त एकच विचार ! त्या पिल्लाला त्याच्या जागेत सुखरूप ठेवायचे.
         प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे माझ्या प्रयत्नाला यश आले. ते पिल्लू त्या भिंतीच्या पोकळीत गेले. मघापासून सुरु असलेली चिवचिवाट थांबली. कामगारांना
" तेथे काम करू नका " अशी सूचना देवून मी घरी आलो.
      खोलीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना मी अनेकवेळा तेथे गेलो. त्यावेळी आवर्जून माझे लक्ष त्या छताजवळील भिंतीकडे जायचे. मी बराच वेळ त्या भिंतीकडे पहात बसायचो.
          चिमणी चोचीत अन्न घेवून यायची. पिल्लांचा चिवचिवाट चालू असताना, पिल्लांच्या तोंडात अन्न 
भरवून, पुन्हा अन्न शोधण्यासाठी निघून जायची. मला मोठी गम्मत वाटायची.
         मी माझ्या लहान मुलांना म्हणालो, आपल्या नवीन घरात चिमणीचे सुद्धा एक घर आहे. तिची बाळेसुद्धा तिथे आहेत.
       घराचे काम पूर्ण झाले. वास्तूशांती करून आम्ही त्या घरात रहायला गेलो. माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला, पप्पा ! कुठे आहेत हो  चिमणीची बाळे ?
        मी वर छताकडे पाहिले. तेथे सारे शांत दिसत होते. चिवचिवाट नाहीच, पण साधा चिवही ऐकायला येत नव्हता. शिडीवर चढून, वर जावून बघण्याचा मला धीर होत नव्हता. मी बराच वेळ वाट पाहिली. एक तास, दोन तास, एक रात्र निघून गेली. पण पिल्लांचा चिवचिवाट ऐकायला येत नव्हता. आणि अन्न शोधायला गेलेली चिमणा चिमणी सुद्धा नजरेला पडत नव्हती. तेव्हा माझ्या लक्षात आले की, पिल्लांना पंख फुटले आणि ते मोकळ्या आकाशात हिंडायला निघून गेली.
         मुले मला सतत विचारीत होती, पप्पा, कुठे आहेत चिमणीची बाळे ?
        मी मूक झालो. स्वत:ला नुकसान सोसून केलेले उपकार, अश्रूच्या रूपाने डोळ्यात जमा होत होते. पिल्लांना पंख फुटले होते आणि त्यांची गरज संपली होती.

2 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete